Menu Home

रिटेल विक्रेत्यांच्या सहयोगाने आता गावोगावी चिकन फेस्टिवल!

देवळा तालुक्यात एकशे साठचा रिटेल चिकन रेट साठ रुपयांवर!

किरकोळ विक्रेत्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत 160 रुपये प्रतिकिलोचे चिकन बोर्ड रेट तब्बल 60 रुपयापर्यंत घटवले!

देवळा, ता. 5 : नाशिक जिल्ह्यात पोल्ट्रीधारक शेतकऱ्यांसमवेत झालेल्या सुसंवादानंतर किरकोळ विक्रेत्यांनी 160 रुपये प्रतिकिलोचे चिकन रेट तब्बल 100 रुपयांनी घटवले! ग्राहकांना अवघे 60 रुपये प्रतिकिलो दराने चिकन उपलब्ध करून दिले!

सध्या ब्रॉयलर्स पक्ष्यांचे ठोक फार्म खरेदीचे दर (लिफ्टिंग रेट) 40 रुपये प्रतिकिलोपर्यंत घटले आहेत. ठोक खरेदीच्या तुलनेत किरकोळ रेट दुप्पट असावेत, असा अलिखित नियम आहे.तथापि, ठोक रेट 40 रुपये प्रतिकिलो होवून देखिल किरकोळ रेट 160 ते 200 रुपये म्हणजे चार पटीपेक्षा अधिक आहेत. या पार्श्वभूमीवर, देवळा तालुक्यातील पोल्ट्रीधारकांनी कसमादे विभागात दौरा काढून बोर्ड रेट कमी करण्याची विनंती रिटेल विक्रेत्यांना केली.

“फार्म गेट रेट वाढल्यानंतर तुम्हीही किरकोळ रेट वाढवा, त्यास कुणाचीही हरकत नसणार आहे, पण जोपर्यंत फार्म रेट खाली आहेत, तोपर्यंत कोंबड्यांचा खप वेगाने होण्यासाठी किरकोळ रेट कमी करावेत,” असे आवाहन शेतकऱ्यांनी केले.
“शेतकरी व रिटेल विक्रेत्यांच्या प्रत्यक्ष भेटीनंतर सुसंवाद वाढतो. गैरसमज कमी होतात. एकमेकांच्या व्यवसायवृद्धीसाठी मदत मिळते. त्यात ग्राहकांसहीत सर्व घटकांचे हित साधले जाते,” असा चर्चेचा सूर होता.

मनोज कापसे, दादा निकम, वैभव पवार, महेंद्र गुंजाळ, भूषण गुंजाळ, राजेंद्र मगर, राजेंद्र बोरसे, भूषण पगार, अभिजित देवरे, रवी आहिरे, मुन्ना धोंडगे आदी संवाद दौऱ्यात सहभागी झाले होते.

…तर आठ दिवसांत समस्या मिटेल
” राज्यातील सर्व पोल्ट्री कंपन्या व पोल्ट्रीधारकांनी रिटेल विक्रेत्यांच्या भेटी घेवून संवाद साधला तर सध्याच्या उत्पादनवाढीची समस्या आठ दिवसांत सौम्य होईल. म्हणून देवळा विभागातील शेतकऱ्यांप्रमाणेच अन्यत्रही अशा प्रकारे रिटेलर्स समवेत भेटी – संवाद घडावेत,” अशी अपेक्षा स्वप्निल अॅग्रोचे संचालक वैभव पवार यांनी व्यक्त केली.

Post by Deepak Chavan, 5 March 2020

Categories: Uncategorized

agriculturist

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *