Menu Home

लढणे म्हणजे काय ते ‘पोल्ट्री’कडून शिकावे…

…एका पोल्ट्री उद्योजकाच्या धडाडीची कहानी, …जरूर वाचा

“लेअर पोल्ट्री व्यवसायात पंधरा वर्षांत मिळाले नाहीत, इतके अनुभव मागील पंधरा महिन्यात मिळालेत. त्यातून शिकून आता नव्याने उभे राहणार आहोत. ज्या व्यवसायाने समाजात मान्यता दिली, तो लेयर पोल्ट्री व्यवसाय  अधिक मजबुतीने करायचाय. जून्या पद्धतीचे शेड आता ईसी (environment control) पद्धतीत रूपांतरीत करायचे काम हाती घेतलेय…” वजीरखेडे (ता. मालेगाव) येथील जिजाई पोल्ट्रीचे संचालक शशिकांत तिसगे सांगत होते.

“ईसी शेड अभावी सध्या पक्ष्यांची मरतूकीत वाढ होते. मालेगाव माळमाथा 45 अंशापर्यंत तापतो. कोरड्या हवामानामुळे अधिक दाहक होतो. शेडवर पाण्याचे फवारे मारून उपयोग होत नाही. ईसी शेडमुळे दहा टक्क्यापर्यंतची मरतूक 5 टक्क्यापर्यंत कमी होईल. नफ्याचे प्रमाण वाढेल. शिवाय, माशांचे प्रमाण कमी होईल. व्यवस्थापन अधिक कार्यक्षमरित्या करता येईल, म्हणून ते काम प्राधान्याने हाती घेतलेय,” असे शशिकांत म्हणाले.

“एप्रिल 2019 पासून कच्च्या मालाची भाववाढ आणि अंड्यांची उत्पादनवाढ या दोन्ही बाबी एकत्रित घडल्या. संपूर्ण आर्थिक वर्षांत उत्पादन खर्चापेक्षा कमी रेटमध्ये अंडी विकले. चालू आर्थिक वर्षांच्या प्रारंभीच कोरोना संकटामुळे खप रोडावला. आधीच दुबळा झालेल्या व्यवसायावर मोठा आघात झाला. पण आता सावरतोय. कच्च्या मालाच्या किमती नरमल्या आहेत. अंड्यांचा खप हळूहळू वाढतोय. बरासाच माल कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवलाय. तो टप्याटप्याने विकायचा आहे.”


शशिकांत व रमाकांत बंधूंनी 1992 मध्ये कमी वयात वडिलांच्या डेअरी व्यवसायात लक्ष घालायला सुरवात केली. त्यांचे वडील श्रावण तिसगे हे देखिल उद्यमी, हिकमती. त्यांनी 80 च्या दशकात 1 म्हशीपासून डेअरी व्यवसाय सुरू केला… 2005 पर्यंत 25 म्हशींपर्यंत व्यवसाय विस्तार झाला. मालेगाव कॅम्पातील दुकानाद्वारे 500 लिटर तर उर्वरित 300 लिटर घरोघरी विक्री होत असे. स्वत:चे तसेच अन्य शेतकऱ्यांकडील दूधाचे संकलन करून आधी सायकल तर नंतर मोटारसायकलीद्वारे विक्री व्यवस्थ उभी केली होती. 

…मधल्या काळात असे लहान डेअरी युनिट्स या ना त्या कारणाने बंद पडत गेले. म्हणून काळाची पावले ओळखून तिसगे कुटुंबियाने टप्प्याटप्प्याने व्यवसायाचा ट्रॅक बदलला. 1998 मध्ये 1 हजार पक्षी क्षमतेचा ब्रॉयलर फार्म 2005 पर्यंत 20 हजार क्षमतेपर्यंत वाढवला. ब्रॉयलर पक्ष्यांच्या किंमतीत मोठे चढ उतार होत होते. रोज विकायला माल नसल्याने सरासरी विक्री दर किफायती येत नव्हता. म्हणून 2007 मध्ये ब्रॉयलर्स ऐवजी लेअर्स (अंडी) पोल्ट्री सुरू केला. त्यानंतर मागे वळून पाहिले नाही.

…मागील पंधरा वर्ष खरोखरच लेअर पोल्ट्रीच्या व्यवसाय वृद्धीला आकार देणारी होती. देशाची अर्थव्यवस्था वाढत होती, तसा अंड्यांचा खप आणि लेअर उद्योगही विस्तारात गेला. तिसगे कुटुंबियांनी आजघडीला प्रतिदिन 65 हजार अंडी उत्पादन क्षमतेपर्यंत विस्तार केलाय. लेईंगला असलेले पक्षी अधिक ब्रीडिंग, ग्रोईंग असा 90 हजार पक्ष्यांचा पोल्ट्री फार्म वजीरखेडे शिवारात उभा केलाय. जोडीला एक कोटी लिटरचे शेततळे, मॅश फिडमिल उभारलीय…आता 24 तास वीज मिळावी यासाठी एक्स्प्रेस लाईनचे काम सुरू आहे. (Poultryawareness website)

फारशी भांडवलीची पार्श्वभूमी नसताना केवळ कष्टातून आणि सतत शिकत, लढत व्यवसाय अधिक मजबूत करण्याच्या सवय; बदल्या काळानुसार व्यवसाय किंवा व्यवसायाअंतर्गत बदल करणे, स्वत: पोल्ट्री फीड तयार करणे, पोल्ट्री खाद्यातील – न्युट्रीशनमध्ये नवनवे प्रयोग करणे, योग्य वेळी मका-सोयामिलची खरेदी करून खाद्यावरील खर्च नियंत्रित करणे, अंडी बाजारभावाचा कल लक्षात घेवून इन्व्हेंटरी मॅनेजमेंट करणे, आपल्याकडील मनुष्यबळाला लेबर म्हणून नाही तर माणसं म्हणून ट्रीट करणे…अशा अनेक गोष्टी तिसगे कुटुंबाकडून शिकण्यासारख्या आहेत. ( संपर्क – शशिकांत तिसगे 9423184619)

लेखक – दीपक चव्हाण, शेती अभ्यासक, पुणे.

Categories: Uncategorized

agriculturist

1 reply

  1. Abhinanden aplya bhavi niyojnas Hardin shubhechya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *