Menu Home

वाया जाणाऱ्या पशुखाद्यातील प्रथिनांचा पुनर्वापर

वाया जाणाऱ्या पशुखाद्यातील प्रथिनांचा पुनर्वापर करण्यासाठी किटकांचा वापर करण्याची कल्पना मल्टीबॉक्सचे माजी कार्यकारी अधिकारी जेम्स व्हाईट यांनी मांडली आहे. अशा टाकाऊ घटकांतील पोषक प्रथिने पुन्हा पशुखाद्यामध्ये वापरण्यासाठी काही नियम व अटींचा अडथळा असला तरी भविष्यामध्ये अन्नाची समस्या सोडवण्यासाठी ही कल्पना अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. या पोषक घटकांपासून पोल्ट्री फीड बनवता येईल, असा दावा व्हाईट करतात.

इंग्लंड येथील सिरेनसेस्टर येथील मल्टीबॉक्स ही कंपनी सर्वात कमी किमतीमध्ये किटकांचे उत्पादन करणारी कंपनी आहे. ती सर्व प्रमाणित निकषांच्या आधारे भाजीपाला पिके आणि त्याच्या टाकाऊ अवशेषांवर कीटकांची वाढ करते. या कंपनीतील कर्मचारी जेम्स राईट यांनी सांगितले, सध्या युरोपिय महासंघाच्या कायद्यानुसार माशांच्या खाद्यामध्ये किटकांचा वापर करणे कायदेशीर आहे. पुढील वर्षापासून पोल्ट्री खाद्यामध्येही त्यांचा वापर करणे कायदेशीर होण्याची शक्यता आहे. आज त्यातील मेद किंवा फॅट्सचा वापर करणे शक्य असले तरी पुढील वर्षापासून त्यातील प्रथिनांचाही वापर करता येईल.

कंपनीने पहिल्या टप्प्यामध्ये काळ्या लष्करी माश्या (ब्लॅक सोल्जर फ्लाय) वर लक्ष केंद्रित केले आहे. पशुखाद्यामध्ये वाढणाऱ्या अळ्या गोळा करून त्यांची तुलना मत्स्यखाद्याशी केली आहे. दोन्हीमध्ये सारखीच प्रथिने आणि पोषक घटक असल्याचे समोर आले. म्हणजेच हा सध्याच्या खाद्यासाठी उत्तम पर्याय होऊ शकतो. मात्र, किटकशेती उद्योगामध्ये गेल्या वर्षात सुमारे ४८० दशलक्ष पौंड (भारतीय चलनामध्ये ४५ अब्ज ३१७ दशलक्ष रुपये.) एवढी गुंतवणूक झाली असली तरी कोणीही पूर्ण आकाराचा वेगळा उद्योग स्थापन केल्याचे उदाहरण दिसत नाही.
मल्टीबॉक्स हा इंग्लंडमधील सर्वात मोठा किटकशेती करणारा फार्म असून, प्रति आठवडा ४०० किलो कीटकांची निर्मिती करतात. त्यांच्या प्रमाणेच अन्य दोन कंपन्या- फ्रान्समधील यनसेक्ट आणि नेदरलॅंड येथील प्रोटिक्स याही कंपन्या व्यावसायिकरित्या किटकांचे उत्पादन करतात. या किटकांचा प्रति टन दर हा ८०० ते १५०० अमेरिकी डॉलर इतका आहे. सध्या त्याची तुलना सोयाबीनशी (आजचा दर -३२३ अमेरिकी डॉलर प्रति टन) केल्यास तो महाग वाटला तरी त्यामुळे टाकाऊ कचऱ्याची समस्या सुटणार आहे.

या उद्योगाची वाढ
-सन २०१० मध्ये किटकांचे उत्पादन अजिबात होत नव्हते. मात्र २०१९ मध्ये जगभरातील सुमारे ५० कंपन्या कीटक प्रथिनांचे उत्पादन करत आहेत. त्यांची प्रथिन उत्पादने सुमारे ६००० टन इतकी आहेत. रॅबो बॅंकेच्या अनुमानानुसार, दहा वर्षापूर्वी शून्य असलेल्या किटक प्रथिन उद्योग सन २०२३ पर्यंत जगभरामध्ये ६.१७ अब्ज डॉलरचा झालेला असेल.

यातील समस्या

  • खाद्यातील टाकाऊ घटकांवर कीटकांची वाढ करताना हे किटक त्यातील काही रोगकारक घटकांचे वाहक ठरू शकतात. यावर सध्या संशोधन सुरू असून मल्टीबॉक्स कंपनीने वेगवेगळ्या टाकाऊ घटकांचा व त्यातील पोषक तत्त्वाचा वापर करून पाहिला आहे. सध्या कंपनीच्या मत्स्यपालन (अॅक्वाकल्चर) उद्योगातील ग्राहकांचा विचार करून खाद्य तयार केले आहे.

– खराब होणाऱ्या अन्नघटकांवर वाढवले जात असलेल्या या कीटकांद्वारेही मोठ्या प्रमाणात अमोनिया वायू उत्सर्जित होतो.

-पोल्ट्री उद्योगासाठी या उद्योगाची वाढ चार दृष्टीने महत्त्वाची आहे.
१. सध्या वाया जात असलेल्या पशू किंवा पोल्ट्री खाद्यावर या कीटकांची वाढ करणे शक्य आहे. त्यांच्यापासून मिळालेल्या प्रथिनांचा वापर पोल्ट्रीखाद्यामध्ये करता येईल.
२. सध्या ब्लॅक सोल्जर माशींचा खाद्यांमध्ये वापर करता येत नसला तरी पुढील वर्षापासून या कायद्यांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.
३. योग्य त्या पोषक घटकांचा वापर किटकांच्या आहारामध्ये केल्यास पोल्ट्री पक्ष्यांचे पौष्टिक पूरक खाद्यही तयार करता येईल.
४. इंग्लंडमधील WRAP या संस्थेच्या मते, घरगुती, हॉटेल आणि अन्य प्रक्रिया उद्योगातून वाया जाणाऱ्या खाद्यपदार्थांचे प्रमाण १० दशलक्ष टन इतके आहे. त्यातील केवळ २० टक्के अन्नांचे म्हणजेच प्रति वर्ष सुमारे १.८ दशलक्ष टन अन्नाचे रूपांतरण कीटकखाद्यांमध्ये करणे शक्य आहे.


कीटकांशी संबंधित युरोपिय कायदे

१९९८ पर्यंत कोणत्याही प्रक्रियायुक्त प्राणीज प्रथिनांचा खाद्य उत्पादनामध्ये (PAP) समावेश करता येत असे. बीएसई कायद्यांच्या सुधारणांनंतर किटक प्रथिनांना बंद आली. या तरतुदीनुसार किटकांचे वर्गीकरण पाळीव सजीवांमध्ये केले गेले. कारण त्यांची वाढ, पैदास आणि कत्तल या सर्व बाबी पाळीव प्राण्यांप्रमाणे केले जाते. पाळीव प्राण्यांसाठी आवश्यक सुधारणा कीटकांसाठी करणे आवश्यक बनले. युरोपिय महासंघाच्या बदलत्या धोरणानुसार किटकांचा वापर मत्स्यखाद्यामध्ये करण्यास परवानगी मिळाली. (स्रोत ः टीम स्क्रावेनेर)

छायाचित्र ः मल्टीबॉक्सचे माजी कार्यकारी अधिकारी जेम्स व्हाईट.

Categories: Uncategorized

agriculturist

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *