Menu Home

‘लॉकडाऊनमुळे बदलताहेत पोल्ट्रीची गणिते’

डॉ. पी. जी. पेडगावकर यांची निरीक्षणे

  • ‘चिकनसाठी सरासरीच्या चाळीस टक्केच मागणी’
  • शेतकऱ्यांनी मागणीच्या प्रमाणात उत्पादन घ्यावे

पुणे, ता. 8 :  कोरोना संसर्गानंतर अर्थव्यवस्था ठप्प असल्याने चिकनला नेहमीसारखा उठाव नाही. पोल्ट्री उद्योगातील नफ्या-तोट्याची समीकरणे बदलली आहेत. ब्रॉयलर्स पक्ष्यांसाठी पुढील काळात सरासरीच्या 40 टक्केच मागणी गृहीत धरून उत्पादनाचे नियोजन करणे क्रमप्राप्त ठरेल, असे व्यंकटेश्वरा हॅजरिजचे महाव्यवस्थापक डॉ. प्रसन्न पेडगावकर यांनी म्हटले आहे.

कोरोना संसर्ग व लॉकडाऊनबाबत येत्या काळातही अनिश्चितता दिसतेय. या पार्श्वभूमीवर, पोल्ट्री उद्योगात कॉन्ट्रॅक्ट फार्मर्स, ओपन फार्मर्स, लहान व मध्यम इंटिग्रेटर्स आणि बड्या कॉर्पोरेट्सची यापुढील वाटचाल कशी राहील, याबाबत डॉ. पेडगावकर यांनी भाष्य केले.
“ओपन फार्मर्स असो वा इंटिग्रेटर्स – सर्वांनी मागणीच्या प्रमाणात उत्पादन संतुलित करणे सयुक्तिक ठरेल.  खासकरून महाराष्ट्रातील पोल्ट्री उद्योगाने बदलती व्यावसायिक गणिते लक्षात घेतली पाहिजेत. जर 40 टक्केच मागणी राहणार असेल तर प्रत्येकाने त्या प्रमाणात उत्पादन राखले पाहिजे. आपल्या एकूण उत्पादनात बाजारातील मागणीच्या रेशोत कपात केली पाहिजे. जेणेकरून तेजी-मंदीत टिकून राहणे शक्य होईल. दक्षिण भारतातील राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील प्रतिडोई चिकनचा खप कमी आहे. महाराष्ट्रात मांसाहार हा नैमित्तिक आणि आठवड्यातील विशिष्ट दिवसांपुरता मर्यादित आहे, ” असे डॉ. पेडगावकर म्हणाले. त्यांच्या भूमिकेचा संक्षिप्त गोषवारा पुढीलप्रमाणे –

“गेल्या दोन दशकात पोल्ट्री इंटिग्रेटर्सनी केवळ उत्पादन केंद्रीय वाढ-विस्तारावर भर दिले. यापुढे चिकनप्रक्रिया आणि थेट विक्रीकडे वळावे लागेल. ग्राहकांच्या आवडीनुसार पोर्शनिंगनुसार फ्रेश, चिल्ड वा फ्रोजन चिकन योग्य दरात विकण्यावर लक्ष केंद्रीत करावे लागेल. त्यासाठीचे लॉजिस्टिक – सप्लाय चेनमध्ये गुंतवणुक वाढवावी लागेल. सुरक्षित व गुणवत्तापूर्ण चिकन थेट ग्राहकापर्यंत पोचवण्याऱ्या लोकल ब्रॅंड् उद्य होताना दिसत आहे. त्या दृष्टिने यापुढे नियोजन आवश्यक ठरेल.”
“नव्याने पोल्ट्री येऊ पाहणाऱ्यांनीही काही काळ थांबा आणि पहाचे धोरणे अमलात आणावे. नवे फार्म उभारण्याऐवजी बंद पडलेले युनिट्स कराराने वा भागिदाराने चालवणे अधिक योग्य ठरेल. कारण, एकीकडे अनेक पोल्ट्री युनिट्स बंद पडत असताना, ते वापरात नसताना, नव्याने स्ट्रक्चर्स उभे करणे म्हणजे राष्ट्रीय संपत्तीचा अपव्यय होय.”

“सध्या महाराष्ट्रातील एकूण ब्रॉयलर्स बर्ड प्लेसमेंटमध्ये कॉन्ट्रॅक्ट फार्मर्सचा मोठा वाटा आहे. सध्याच्या पेचप्रसंगामुळे पोल्ट्री शेडमध्ये कमी बॅचेस निघत आहेत. पर्यायाने कॉन्ट्रॅक्ट फार्मर्सचेही उत्पन्न घटतेय. मात्र, जे शेतकरी चांगला एफसीआर राखतात. उत्तम व्यवस्थापन करतात. त्यांच्याकडे प्लेसमेंट नियमित राहिल. एकूण व्यवस्थापन आणि एफसीआर सारख्या परफॉर्मन्सबाबत तक्रार असेल, तर त्यासंदर्भात आपली कामगिरी सुधारण्याची संधी म्हणून या संकटाकडे पाहिले पाहिजे.”

पोल्ट्री उद्योगात दर दहा वर्षांनी मोठे बदल होतात. यापुढील काळ हा ग्राहककेंद्रीत उत्पादन व पुरवठासाखळी विकसित करण्याचा आहे. ड्रेस्ड चिल्ड चिकन, पोर्शन विक्री यासाठीची प्रक्रिया, पुरवठा साखळी मजबूत करणे, केवळ उत्पादन केंद्रीत नियोजनाऐवजी बॅकवर्ड व फॉरवर्ड इंटिग्रेशन साधणे आवश्यक ठरेल. बाजारातील बदलले ट्रेंड लक्षात घेत, त्याप्रमाणे बदलण्याशिवाय पर्याय नाही, असे डॉ. पेडगावकर यांनी नमूद केले.

Categories: Uncategorized

agriculturist

3 replies

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *