Menu Home

मांसल कोंबड्यांच्या वाढीसाठी नॅनो खनिजे महत्त्वाची

नॉटिंगहॅम ट्रेंट विद्यापीठातील संशोधकांच्या गटाने नॅनो खनिजे निर्मितीची नावीन्यपूर्ण पद्धती तयार केली आहेत. नॅनो म्हणजे अतिसूक्ष्म खनिजे – एक मीटरचा अब्जाव्या भागाला इंग्रजीमध्ये नॅनो असे संबोधतात. संशोधकांनी अमिनो आम्लांचे आवरण असलेल्या झिंकयुक्त नॅनो खनिजांची निर्मिती केली. त्याचा वापर मांस कोंबड्यांमध्ये करून वाढीवर होणारे परिणाम तपासले. यामुळे पक्ष्यांची खाद्य घेण्याची क्षमता आणि वजन हे सामान्य असेंद्रिय झिंक दिलेल्या पक्षी गटाच्या तुलनेमध्ये अधिक राहत असल्याचे अभ्यासात दिसून आले. पक्ष्यांची पचनक्षमता वाढली असून, मोठ्या हाडांच्या (tibia) क्षमतेवरही चांगले परिणाम दिसून आले.

आधुनिक मांसल कोंबड्यांमध्ये वाढीच्या दरात सुधारणा करण्यासाठी अधिक काळजीपूर्वक व्यवस्थापनाची गरज असते. वाढीदरम्यान निर्माण होणारे विविध समस्या उदा. हाडांच्या वाढीमुळे येणारा लंगडेपणा, कापण्यापूर्वी येणारा लंगडेपणा आणि प्रक्रियेदरम्यान येणाऱ्या अडचणी टाळण्यासाठी वाढत्या वजनासोबतच हाडांची ताकद किंवा क्षमता वाढली पाहिजे. पोल्ट्रीखाद्यामध्ये खनिजांचा वापर करताना त्यांचा नॅनो (लहान) आकार हा अत्यंत महत्त्वाचा असून, त्यामुळे त्यांची शरीरामध्ये उपलब्धता वाढते. म्हणजेच खनिजे अधिक कार्यक्षमपणे शरीराच्या सर्व भागामध्ये पोचवली जातात. त्यात या खनिजांना अमिनो आम्लाचे आवरण (कोटिंग) दिलेले असल्याने खनिजांचे शरीराद्वारे शोषण अधिक चांगल्या प्रकारे होते.

अनेक वनस्पती व प्राणीज स्रोतांतून मिळवलेल्या पोल्ट्री खाद्यामध्ये जस्त (झिंक) असते. मात्र, त्यामध्ये सामान्यतः अधिक प्रमाणात फायटेट असते. या फायटेटमुळे जस्त खनिज बद्ध होऊन जाते. पचनसंस्थेमध्ये त्यांचे शोषण होण्यापासून रोखले जाते. यामुळे अशा आहारातील जस्ताची जैविक उपलब्धता घटते. ती आरोग्यपूर्ण पक्ष्यांच्या निकषापेक्षा कमी राहते.
पोल्ट्रीमध्ये दिसून येणाऱ्या जस्ताच्या कमतरतेमुळे पुढील समस्या उद्भवतात.
१) पक्ष्यांची वाढ कमी होते. २) पायातील लांबी कमी राहून जाडी वाढते. ३) पायाचे मोठे हाड (हॉक) आणि पंखांच्या समस्या उद्भवतात.
या समस्यांवर मात करण्यासाठी पोल्ट्रीमध्ये दिल्या जाणाऱ्या पुरक खाद्यामध्ये अधिकचे जस्त (झिंक) द्यावे लागते.

नॉटिंगहॅम ट्रेंट विद्यापीठातील प्राणी, ग्रामीण आणि पर्यावरण शास्त्र विद्यालय आणि शास्त्र आणि तंत्रज्ञान विद्यालयामध्ये करण्यात आलेल्या अभ्यासाचे निष्कर्ष जर्नल अॅनिमल्स मध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत. विद्यापीठातील प्रो. एमिली बर्टन यांनी सांगितले, की पोल्ट्रीतील पक्ष्यांच्या आरोग्य आणि वाढीवर जस्ताचा चांगला परिणाम होतो. नुकतीच शोधलेली पद्धत ही जस्ताच्या कमी खर्चातील उपलब्धता आणि पचनीयतेसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. याचाच अर्थ आपण अत्यंत कमी मात्रेमध्येही जस्ताचा वापर करू शकतो. परिणामी पोल्ट्री खतातून अधिक प्रमाणात जस्त पर्यावरणामध्ये मिसळून प्रदूषण होण्याची शक्यता कमी होईल.

नॉटिंगहॅम ट्रेंट विद्यापीठातील प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. गॅरेथ केव्ह यांनी सांगितले, की नॅनो तंत्रज्ञान हे वैद्यकीय ते वनस्पती खाद्यापर्यंत वेगवेगळ्या प्रांतामध्ये मोठ्या प्रमाणात वापरले जाऊ लागले आहे. आमच्या आंतरशाखीय संशोधनाच्या उद्देशापैकी एक उद्देश हा जागतिक अन्न सुरक्षेला प्राधान्य देण्याचाही होता. अन्नाची उपलब्धता ही उत्पादनातील सुधारणेइतकीच पुरक खाद्याचे मूल्य वाढवण्यातून साध्य होणार आहे. या संशोधनामध्ये आम्ही नॅनो तंत्रज्ञानातून पशुपक्षी खाद्यातील जैवघटकांची उपलब्धता कशा प्रकारे वाढवता येईल, यावर लक्ष केंद्रित केले. त्यातून प्राण्यांचे उत्पादन वाढणार आहे. तसेच पोल्ट्री विष्ठेतील अतिरिक्त जस्त बाहेर पडून होणारे पर्यावरणातील प्रदूषणही कमी होऊ शकते. ( पोल्ट्री अवेअरनेस वेबसाईटसाठी भाषांतरीत मजकूर) कॉपीराईट.

Categories: Uncategorized

agriculturist

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *