Menu Home

शेतकरी कंपन्यांद्वारे पोल्ट्री उद्योगाला थेट मका पुरवठा

  • ‘करमाड’ व ‘गोदा’ फार्म्सचा संयुक्त उपक्रम
  • शिवराई येथे वजन-काट्यासह ‘ड्राईंग यार्ड’चे उद्घाटन

वैजापूर, जि. औरंगाबाद : शासकीय धान्य खरेदीच्या यशस्वी उपक्रमानंतर शेतकरी कंपन्यांनी खासगी उद्योगांसाठीही थेट शेतमाल खरेदी सुरू केली आहे. शिवराई (ता. वैजापूर) येथे शेतकऱ्यांकडून मका खरेदी आणि पोल्ट्रीसह प्रक्रिया उद्योगाला थेट पुरवठा उपक्रमाचे नुकतेच उद्घाटन झाले.
करमाड फार्मर प्रोड्यूसर प्रा. लि. आणि गोदावरी फार्मर्स प्रोड्यूसर प्रा. लि. या दोन शेतकऱी कंपन्यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांकडून मका खरेदी व प्रक्रिया उद्योगाला थेट पुरवठा उपक्रम सुरू करण्यात आला. यानिमित्ताने आयोजित शेतकरी संवाद कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयकर विभागाचे उपायुक्त डॉ. उज्ज्वल चव्हाण होते. सिद्धीविनायक पोल्ट्री ब्रीडर्स कंपनीचे चेअरमन डॉ. अजय देशपांडे, अलिबाग येथील ‘कु कु च कू’ कंपनीचे संचालक कुणाल पाथरे यांच्या हस्ते थेट खरेदीचे उद्धघाटन झाले. कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. किसन लवांडे, प्रशासकीय अधिकारी संजय काटकर प्रमुख पाहुणे होते.
“शेतकरी कंपन्याद्वारे संपूर्ण गाव एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, शेतकऱ्याला किफायती बाजारभाव तर बेरोजगारांना काम देण्याची उदिष्ट यातून साध्य होत आहे,” असे निरीक्षण डॉ. चव्हाण यांनी व्यक्त केले.
“राज्यातील ‘एफपीसीज’द्वारे मक्याचा थेट पुरवठा झाल्यास शेतकऱ्यांना किफायती बाजारभाव मिळेल आणि पोल्ट्री उद्योगालाही गुणवत्तापूर्ण मालाची हमी मिळेल,” असे मत सिद्धीविनायक पोल्ट्री ब्रीडर्स कंपनीचे चेअरमन डॉ. अजय देशपांडे यांनी व्यक्त केले.
“शेतकरी कंपन्यांची चळवळ ही राज्यातील शेती – उद्योगाला उर्जितावस्था देणारी ठरणार आहे. शेतीत संकटे आणि समस्या आहेत, पण त्यापुढे हार न मानता त्यावर उद्यमशीलतेतून उत्तर शोधण्याचा प्रयत्न शेतकरी कंपन्या करत आहेत, असे प्रशंसोद्गार श्री. काटकर यांनी काढले.
“या वर्षी रब्बीत मक्याचे क्षेत्र वाढणार आहे. पर्यायाने पशुपक्षी खाद्य उत्पादक कंपन्या, स्टार्च व डिस्टलरी उद्योगाला थेट पुरवठा करण्यासाठी मक्याची मुबलक उपलब्धता राहील. शेतकऱ्यांना योग्य वेळेत पेमेंट व किफायती बाजारभाव देण्याचे आणि पोल्ट्री उद्योगाला गुणवत्तापूर्ण मालाचा पुरवठा करण्याचे उदिष्ट आहे.” असे करमाड फार्म्सेचे संचालक गोविंद डिके यांनी सांगितले. संचालक विष्णू घोडके, भारत सपकाळ यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.
पथदर्शक उपक्रम : थेट मका पुरवठा हा ‘करमाड’ व ‘गोदा’ फार्म्सचा राज्यातील शेतकरी कंपन्यांसाठी पथदर्शक उपक्रम ठरणार आहे. थेट मका खरेदीसाठी वजनकाटा, ड्राईंग यार्ड आदी सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. यामुळे खरेदी व थेट विक्रीचे मॉडेल अधिक शाश्वत झाले आहे.
Post & Photo By Deepak Chavan, Pune.

संपर्क – करमाड फार्म्स – संचालक गोविंद डिके – 9421862262, संचालक भारत सपकाळ – 9823758582, संचालक विष्णू घोडके – 7972476841, कार्यालयीन अधिकारी जयदीप देशमुख 94204 74644

Categories: Uncategorized

agriculturist

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *