Menu Home

लष्करी अळीमुळे प्रोटिन सुरक्षा धोक्यात?

Image may contain: plant, nature and outdoor

1. मक्यावर लष्करी अळीच्या प्रादुर्भावाचा संबंध थेट देशाच्या अन्न सुरक्षेशी आहे.

2. एक कोंबडी साधारपणे सव्वा तीन किलो खाद्य खावून दोन किलो वजन देते. या खाद्यात दोन किलो मका व एक किलो सोयामिल असते.

3. थोडक्यात मका हा अंडी व चिकन उत्पादनातील प्रमुख कच्चा माल आहे. पोल्ट्रीच्या उत्पादन खर्चात 80 टक्के वाटा खाद्याचा असतो तर खाद्यात 50 टक्के वाटा मक्याचा असतो.

4. अन्नधान्य महागाई निर्देशांकात चिकन आणि अंडी यांचाही समावेश आहे. कोट्यावधी गरीब घरात आमलेट, अंडाकरी हे दैनंदिन आहाराचे भाग आहेत.

5. गेल्या वर्षी दुष्काळामुळे देशातील मक्याचे उत्पादन घटले आणि आज महाराष्ट्रात 2300 ते 2450 या ऐतिहासिक उच्चांकी पातळीवर पोचले.

6.एकाच वर्षा मक्याचे दर शंभर टक्क्यांनी वाढल्यामुळे ब्रॉयलर्स व लेअर पोल्ट्रीच्या उत्पादन खर्चात किमान 25 टक्क्यापर्यंत वाढ झाली अन् हा व्यवसाय शॉर्ट मार्जिनमध्ये आहे.

7. ऐन दुष्काळात आता संकट आहे, लष्करी अळीचे. महाराष्ट्रातील मराठवाडा व उत्तर महाराष्ट्र या प्रमुख मका उत्पादक विभागात गेल्या वर्षीच्या तुलनेत मोठा आऊटब्रेक आहे.

8. मान्सून विलंबामुळे मक्याचा हंगाम पंधरा दिवस – तीन आठवड्याने लांबला. त्यातही संरक्षित पाण्यावर जो आगाप मका पेरा होता, त्यावर सर्वदूर लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसतो.

9. आजघडीला कांद्याप्रमाणेच सुमारे सव्वा दोन कोटी टन इतकी मक्याची वार्षिक गरज आहे. कोंबड्यांना दररोज मक्यापासून तयार केलेले खाद्य लागते. कांद्याप्रमाणेच ही दैनंदिन खपाची कमोडिटी आहे.

10. देशातील एकूण उत्पादनातील 55 टक्के मका पोल्ट्री उद्योगासाठी, 25 टक्के मका स्टार्च उद्योग, 10 ते 15 टक्के मानवी आहारात, तर 5 ते 7 टक्के निर्यातीसह अन्य बाबींत उपयोगात येतो.

11. मक्याचा तुटवडा पर्यायाने चिकन आणि अंड्यांचा तुटवडा हे साधे समीकरण आहे. आजघडीला चिकनचे रेट्स 200 ते 250 रु. प्रतिकिलो या आजवरच्या सर्वोच्च पातळीवर पोचले आहेत.

12. मक्यावरील लष्करी अळीचा प्रादुर्भाव हाताबाहेर जाण्याच्या बेतात आहे. राज्याच्या कृषी खात्याने तर ‘आपल्या जबाबदारीवर मका पेरा’असा संदेश प्रसारित केला आहे.

13. जगभरात हजारो एकरवरील पीक काही दिवसांत फस्त करणारी, वेगाने फैलाणारी – अशी लष्करी अळीची ओळख आहे. गेल्या वर्षीच कर्नाटकात 80 हजार हेक्टरवर क्षेत्र बाधित झाले होते.

14. गेल्या वर्षी लोकसभेतही लष्करी अळीचा मुद्दा चर्चेत आला होता. पुढे संकटाची व्याप्ती वाढणार हे स्पष्ट असतानाही, राज्य व केंद्राच्या कृषी खात्यांनी, विस्तार यंत्रणांकडून आणीबाणी स्तरावर प्रतिबंधात्मक उपाय अपेक्षित होते.

15. मुख्य चिंता आहे, 2019-20 मधील मका उपलब्धतेची. जर लष्करी अळीने बहुतांश पीक खाल्ले तर आयातीशिवाय अन्य पर्याय नाहीत. युक्रेन हा नॉन जीएमओ मक्याचा प्रमुख पुरवठादार आहे.

16. मक्यावरील लष्करी अळी हा राष्ट्रीय चर्चेचा मुद्दा आहे. कुपोषणासह अन्न सुरक्षा, महागाई वाढ, शेतकऱ्यांची उत्पन्नवाढ असे अनेक मुद्दे त्यात आहेत.

…लष्करी अळीचा प्रादुर्भाव आता मकाच नव्हे तर अन्य धान्यपिकांसह ऊसासारख्या पिकावरही दिसू लागला आहे. आणखी चिंताजनक आहे. photo credit Dr. Ankush Chormule

– दीपक चव्हाण, पुणे.

9881907234

ता. 29 जून 2019

Categories: Uncategorized

agriculturist

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *