Menu Home

पोषण सुरक्षेचा जागर; ‘व्हेट्स’पुढाकार

‘व्हेट्स इन पोल्ट्री’च्या वतीने पुण्यात ता. 28 रोजी पोषण जनजागृती फेरीचे आयोजन करण्यात आले असून, एक हजार नागरिकांचा सहभाग अपेक्षित आहे.

‘व्हेट्स इन पोल्ट्री’  ( Vets in Poultry – VIP ) ही भारतातील पशुवैद्यकांची (व्हेटर्नरी डॉक्टर्स) संघटना असून, विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत आहे. या संघटनेच्यावतीने रविवार ता. 28 रोजी कुपोषण निर्मूलनासाठी पोषण जनजागृती फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. सुमारे एक हजार नागरिकांचा सहभाग अपेक्षित आहे. रॅलीचा तपशील पुढीलप्रमाणे – सकाळी 7 वाजता बालगंधर्व रंगमंदिर चौकातून रॅलीचा प्रारंभ होईल. झाशी राणी चौक – जंगली महाराज रस्ता – गुडलक चौक – फर्ग्युसन  कॉलेज रस्ता – शिरोळे रस्ता- संभाजी उद्यानात समारोप. समारोपप्रसंगी उकडलेल्या अंड्यांचे वाटप केले जाणार आहे. या फेरीस नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष डॉ. अजय देशपांडे, सचिव डॉ. संतोष इरे यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि स्वयंसेवकांनी आहे.

***

पोषण सुरक्षा जनजागृती फेरीमागील भूमिका

भारत अन्नधान्यांबाबत स्वयंपूर्ण आहे. मात्र, पोषणसुरक्षेच्या बाबतीत भारत किती मागे आहे,  हे आजवर विविध संस्थांनी केलेल्या पाहणीतून समोर आले आहे. अलिकडेच, भारतात 38 टक्के मुले कुपोषित तर 50 टक्के महिला अनॅमिक ( रक्तक्षयी) असल्याचे नीती आयोगाने म्हटले आहे. भारतीय लोकांना दररोजच्या अन्नातून सरासरी ३७ ग्रॅम प्रथिनं मिळतात, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या पाहणीत म्हटले आहे. सरासरी शिफारशीच्या तुलनेत हे प्रमाण जवळपास निम्याने कमी आहे. प्रत्येक व्यक्तिनं वजनानुसार ०.८ ते १ ग्रॅम प्रथिने घ्यायला हवीत, अशी शिफारस ही संघटना करते. म्हणजे ७० किलो वजनाच्या माणसाने ५६ ते ७० ग्रॅम प्रथिने घ्यायला हवीत. प्रत्यक्षात तेव्हढी घेतली जात नाहीत. विकसित देशांच्या तुलनेत हे प्रमाण निम्याहून कमी आहे.

भारत जागतिक अंडी उत्पादनात तिसरा, तर ब्रॉयलर्स उत्पादनात चौथा आहे. मात्र, प्रतिडोई अंडी सेवनात भारत (६९), अमेरिका (२५३) आणि चीन (३४८) यांच्या खूप मागे आहे. चिकन, मासे आणि दूधजन्य पदार्थांच्या प्रतिडोई सेवनाबाबतही जवळपास असेच चित्र आहे. सर्वांत धक्कादायक म्हणजे, ‘ओईसीडी ‘ या विकसित राष्ट्रांच्या ताज्या पाहणीत तर पोषणसुरक्षेत भारताचा क्रमांक हा दक्षिण आफ्रिका,  ब्राझिल आणि इंडोनेशिया आदी विकसनशील देशांच्या तुलनेत खूपच पिछाडीवर दिसतोय. देशांतर्गत पोल्ट्री, मत्स्य उद्योगाला गती देण्याची गरज आहे.

अलिकडेच भारतीयांच्या आहारशैलीबाबत झालेल्या एका पाहणीत ९१ टक्के शाकाहारी आणि ८५ टक्के मांसाहारी वयस्कांमध्ये प्रथिनांची कमतरता आढळली. जवळपास ८८ टक्के वयस्क भारतीय प्रथिनांच्या बाबतीत कुपोषित असल्याचं समोर आलं. अशक्तपणा आणि थकवा ही सर्वांत मोठी लक्षण पुढे आली तर स्थूलता, उच्च रक्तदाब व मधूमेह आदी विकारांमागेही आहारातील असंतूलन निमित्त ठरल्याचे दिसले. थोडक्यात शाकाहारी असो वा मिश्रहारी कुणीही व्यवस्थित आणि पुरेसा आहार घेत नसल्याचे समोर येतेय. भारतीयांमध्ये प्रथिनांची कमतरता हा पोषण तज्ज्ञांच्या दृष्टिने चिंतेचा विषय आहे. बदलते जीवनमान, ताणतणाव आणि विसंगत आहारशैलीमुळे आरोग्यविषयक समस्या निर्माण होत आहेत. देशात अगदी सधन कुटुंबातही कुपोषणाची समस्या असल्याची निरीक्षणे आहेत. समाजातील सर्वच स्तरात कुपोषण दिसतंय. आहारविषयक जागृतीवरही सरकारला भर द्यावा लागणार आहे. दररोज किती उष्मांक, प्रथिनं घ्यायला हवीत, याबाबत शालेय पातळीवर प्रचार – प्रसार करावा लागणार आहे.

पोल्ट्रीमुळे रोजगारवृद्धी

अधिकृत माहितीनुसार आजघडीला पोल्ट्री उद्योगाची वार्षिक उलाढाल एक लाख कोटींवर पोचली आहे. देशात आजघडीला सुमारे 23 कोटी अंडी व 2 कोटी किलो चिकन ही देशाची दैनंदिन गरज आहे. मका हा कोंबड्यांचा मुख्य आहार आहे. पोल्ट्री उत्पादनातील 80 टक्के खर्च मका व सोयावर होतो. त्याअनुषंगाने 80 लाख हेक्टरवरील मका आणि 110 लाख हेक्टरवरील सोयाबीनची शेती अप्रत्यक्षपणे पोल्ट्री उद्योगावर अवलंबून आहे. देशाचे शेती क्षेत्र अडचणीत असताना पोल्ट्री व्यवसायाने गेली दोन दशके आठ टक्के विकासदर राखला आहे.

महाराष्ट्रात ब्रॉयलर पोल्ट्री उद्योगावर सुमारे दहा हजार पोल्ट्रीधारक शेतकरी कुटुंबे थेट अवलंबून आहेत. सुमारे 12 हजार लोकांना पोल्ट्री कंपन्यांत थेट रोजगार मिळाला आहे तर 15 हजार लोकांना चिकन सेंटर्सवर रोजगार मिळतोय. महाराष्ट्रातील 10 लाख हेक्टरवरील मका आणि 35 लाख हेक्टरवरील सोयाबीनचा बाजार पोल्ट्री उद्योगावर अवलंबून आहे. सुमारे पाच लाख मका – सोयाबीन उत्पादक शेतकरी कुटुंबांना अप्रत्यक्षपणे पोल्ट्री उद्योग रोजगार पुरवतोय.

प्लास्टिक अंडी : वस्तूस्थिती आणि गैरसमज

मागील काही दिवसांपासून तथाकथित प्लास्टिक अंडीबाबत काही माध्यमांत बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. खासकरुन महाराष्ट्र, केरळ आणि पश्चिम बंगाल या राज्यांत सोशल मिडियांत यासंबंधी विपर्यस्त, अशास्त्रीय आशयाच्या पोष्ट फिरत आहेत. या पार्श्वभूमीवर, नेमकी वस्तूस्थिती समोर आली पाहिजे. त्याने ग्राहकांचा संभ्रम दूर होईल.

1. चीनमध्ये शंभर टक्के तपकिरी कवचाच्या अंडयांचे उत्पादन होते, तर भारतीय अंडयांचे कवच हे सफेद असते. चीनमधून तस्करी करुन भारतात अंडी आयात करणे हे आर्थिकदृष्टया परवडणारे नाही. शिवाय, नैसर्गिक अंडयांच्या तुलनेत कृत्रिम अंडी तयार करणे हे अतिशय खर्चिक ठरु शकते. भारतात अंडयांची विपूल उपलब्धता असून, सध्या शेतकरी उत्पादन खर्चाच्या आसपास किमतीला अंडी विकत असताना प्लास्टिक अंडी निर्माण करण्याच्या प्रश्नच उद्भवत नाही.

2. यंदा उन्हाळ्याच्या सुरवातीलाच उच्चांकी तापमानवाढ होती. आपल्याकडे रोजच्या गरजेसाठी खपणारी अंडी शितगृहात न ठेवता ती थेट बाजारात आणली जातात. वाहतूक प्रक्रियेत रेफ्रिजरेटेड कंटेनर्स वापरली जात नाहीत. अशा परिस्थितीत अंडयातील पिवळा भाग ( योक ) थोडा कडक होतो. त्याचे कारण उष्म्यामुळे बाष्पीभवन होवून, अंडयाच्या आतील आर्द्रतेचे प्रमाण कमी होते. परिणामी, अंडी उकडली जातात, तेव्हा पिवळा भाग काहीसा कडक आणि रबरासारखा होतो. कमी आर्द्रतेमुळे अंडयांचा पांढरा भाग देखिल शिजवल्यानंतर काहीसा रबरासारखा होवू शकतो. मात्र, तापमान सामान्य असते तेव्हा मात्र असे प्रकार घडत नाही. या प्रक्रियेत अंडयांच्या पोषणमुल्यात त्यामुळे काहाही बदल होत नाही. पुर्वीसारखेच त्यातील पोषकता सुरक्षित असते.

3. ज्या वेळेला अंडयांना कमी मागणी असते, तेव्हा शितगृहांमध्ये दहा सेल्सिअस तापमानाला साठवली जातात. सापेक्ष आर्द्रता 75 ते 80 टक्के राखली जाते. साधारपणे ऑगस्ट ते सप्टेंबर या काळात कमी मागणीमुळे अंडी शितगृहात साठवली जातात, पुढे थंडी वाढल्यानंतर ती बाजारात येतात.

4. अंडयातील आर्द्रता कमी झाल्यानंतर त्यातील पोषणमुल्यात कसलाही बदल होत नाही. कुणीही व्यक्ती प्रयोगशाळेत जावून अंडयातील प्रथिने आणि अन्य पोषक घटकांची चाचणी करु शकते. दुसरे महत्त्वाचे उन्हाळ्यात अंडी खावू नये हा देखिल गैरसमज आहे. या उलट, वाढत्या उष्म्यामुळे माणसाच्या उर्जेची पातळी खालावते. अशावेळी शरिराची झीज टाळण्यासाठी अंडयांची गरज असते. त्यामुळे नियमितपणे अंडी खाल्ली पाहिजेत.

5. जगातील सर्वांत सुरक्षित आणि पोषणमुल्ययुक्त अंडी भारतात उत्पादित होतात. अमेरिकेसह सर्व विकसित देशांत जीएमओ (जनुकीय बदल केलेले) मका आणि सोयामिल हे पोल्ट्री खाद्यात वापरली जातात. भारतातील मका आणि सोयामिल हे नॉन जीएमओ प्रकारातील आहेत.  जगभरात भारतीय अंडी ही नॉन जीएमओ खादय वापरुन उत्पादित प्रकारात मोडतात. त्या आधारावर निर्यातीसाठीही विशेष मागणी असते.

6. आतापर्यंत विविध राज्यांत तथाकथित व संशयित प्लास्टिक अंडयांची चाचणी प्रयोगशाळांध्ये झाली असून, त्यात ही अंडी कोंबडीपासून निर्मित – जैविक अंडी असल्याचे, म्हणजेच प्लास्टिक नसल्याचे निष्पन्न झाले आहे. या पार्श्वभूमीवर, भारतीय अंडी खाण्यास अत्यंत सुरक्षित आहे. अंडी उदयोगावर लाखो शेतकरी थेट अवलंबून असून, चुकीच्या माहितीमुळे त्यांच्या रोजगारवर गदा येवू शकते. शिवाय, ग्राहक चांगल्या पोषणापासून वंचित राहू शकतात. त्यामुळे सोशल मिडियाद्वारे अशी माहिती पसरवाताना खात्री करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

7. गेल्या वर्षीच सरकारी नियामक एफएसएसआयने चाचणीअंती प्लास्टिक अंडी ही अफवा असून, यात तथ्य नसल्याचे स्पष्ट केले आहे.

अॅंटिबायोटिक्स आणि चिकन

भारतासह जगभरातील नामवंत दैनिके-नियतकालिकांत पोल्ट्रीत वापरात येणाऱ्या अॅंटिबायोटिक्सबाबत चर्चा सुरू आहे. पक्ष्यांच्या संगोपनादरम्यान वापरली जाणारी अॅंटिबायोटिक्स ही चिकन-अंडी सेवनातून मानवी शरिरात प्रवेश करतात. माणसात अॅंटिबायोटिक्स प्रतिरोध (रेजिस्ट्न्स) वाढतो. उपचारादरम्यान अॅंटिबायोटिक्स प्रभावहीन ठरतात. पोल्ट्री उद्योगाने माणसांसाठी वापरली जाणारी अॅंटिबायोटिक्स पक्ष्यांच्या संगोपनात वापरू नयेत, असा सूर जगभरात निघतोय. याबाबतची भारतातील वस्तूस्थिती संबंधित तज्ज्ञांकडून जाणून घेतली. त्यांचे म्हणणे असे:

1. पोल्ट्रीत पक्ष्यांचे आजार बरे करण्यासाठी अॅंटिबायोटिक्स वापरली जातात.

2. पोल्ट्री सायन्सनुसार आणि शास्त्रीय शिफारशीनुसार अॅंटिबायोटिक्सचा अंश माणसांत उतरणार नाही या मर्यादेतच (एमआरएल) खाद्याद्वारे पक्ष्यांना दिली जातात.

3. पक्ष्यांच्या वाढीच्या पहिल्या टप्प्यात म्हणजे 21 दिवसांपर्यंत अॅंटिबायोटिक्स वापरली जातात. आठ दिवसांनंतर त्यांचा प्रभाव संपतो. भारतात 35 ते 40 दिवसांच्या पुढील वयाचे पक्षी विक्रीस येतात.

4. आधुनिक पोल्ट्री खाद्य व्यवस्थापनात अॅंटिबायोटिक्सला पर्यायी ग्रोथ प्रमोटर्स वापरली जावू लागली आहेत. ज्यामुळे पोल्ट्रीत अॅंटिबायोटिक्सचा वापर शून्यावर आणता येऊ शकतो.

5. अॅंटिबायोटिक्स ही खूप महाग असतात. त्यामुळे उत्पादन खर्चही वाढू शकतो. शास्त्रीय मर्यादेपेक्षा जास्त वापरता येत नाही.

6. अज्ञानापोटी अॅंटिबायोटिक्सचा अंसतुलित वापर होऊ नये, यासाठी पोल्ट्री उद्योगाकडून शेतकऱ्यांत जागृती केली जात आहे.

7. अॅंटिबायोटिक्स प्रतिरोध वाढण्यास चिकन-अंडी जबाबदार नाही. वैद्यकीय क्षेत्राकडून गरजेपेक्षा जास्त अॅंटिबायोटिक्स लिहून दिल्याची उदाहरणे आहेत.

8. ग्राहकांना सुरक्षित आणि पोषणयुक्त आहार पुरविणे, याला भारतीय पोल्ट्री उद्योग सर्वोच्च प्राधान्य देतो. ग्राहकहितातच उद्योगाचे हित आहे.

लष्करी अळी : तत्कालिक संकट

देशात खरीप मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव झालाय. महाराष्ट्रासह देशातील प्रमुख उत्पादक राज्यांत मक्याचे पीक संकटात आलेय. परिणामी बाजारभाव आजवरच्या उच्चांकी 2300 ते 2500 रु. प्रतिक्विंटलवर पोचले आहेत. वर्षभरात मक्याचे भाव दुपटीवर पोचलेत. पोल्ट्रीला पुढे कच्चा माल मिळाला नाही, तर अन्नसुरक्षेचा प्रश्न आहे. कारण, मकाच उपलब्ध झाला नाही, तर कोंबड्या कशा जगवणार. मक्याचे भाव वाढल्याने उत्पादन खर्च वाढलाय. आज ब्रॉयलर्सचा प्रतिकिलो उत्पादन खर्च 80 रु. आहे, तर फार्म लिफ्टिंग बाजारभाव 60 रु. प्रतिकिलो आहे. अंड्याचा प्रतिकिलो उत्पादन खर्च 4 रु. पर्यंत पोचला असून, गेल्या काही महिन्यातील सरासरी फार्म लिफ्टिंग बाजारभाव तीन रुपयाच्या आसपास आहे. पोल्ट्री उद्योगाचे कंबरडे मोडले आहे. पुढे गरीबांच्या ताटातून अंडाकरी, आमलेट गायब होईल काय, इतपत परिस्थिती खराब झाली आहे. प्रोटिन सिक्युरिटीचा प्रश्न आहे. महाराष्ट्रात मक्यावर लष्करी अळीचा सर्वांत मोठा प्रार्दुभाव असून, निम्मे पिके वाया गेल्यात जमा आहे. या पार्श्वभूमीवर, सरकारी यंत्रणांनी पोल्ट्री उद्योगाला विश्वासात घेवून तातडीने उपाय योजावेत अशी आमची मागणी आहे.

वरील पार्श्वभूमीवर मुख्यप्रवाहातील माध्यमासह सोशल मिडियातील मान्यवरांना विनंती आहे,की त्यांनी पोल्ट्री क्षेत्राबाबत वरील वस्तूस्थिती लक्षात घ्यावी आणि देशाच्या पोषण साक्षरतेच्या कार्यासाठी सहकार्य करावे.

लेखक – दीपक चव्हाण, कृषी पत्रकार, पुणे.

Categories: Uncategorized

agriculturist

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *