Menu Home

पोल्ट्री खतातून वीज अन पिकांना पोषणही

*पोल्ट्री खतातून वीजनिर्मिती आणि पिकांचे पोषणही*

पोल्ट्री ब्रीडर्स फार्ममधील खतातून गॅस काढल्यानंतर उरणारी स्लरी ही पीक व्यवस्थापनात अत्यंत पोषक घटक म्हणून पुढे येतेय. उदाहरणार्थ, लखमापूर येथील बीएस्सी बॉटनी पदवीधारक शेतकरी किरण बच्छाव यांनी दिलेला तपशील इथे जोडला आहे. ते सांगतात, की शंभर टक्के कंपोष्ट झालेल्या स्लरीतील मिथेन गॅस निघून गेलेला असतो. या स्लरीद्वारे पिकांना तत्काळ एनपीके मिळतात. वाढ व गुणवत्ता सुधारते. पोल्ट्री खतासारखा उग्र वास येत नाही.

आनंद अॅग्रो समूहाचा ठेंगोडा येथे ब्रीडर फार्म आहे. येथे पोल्ट्री खतावर बायोगॅसद्वारे वीजनिर्मितीचा प्रकल्पही कार्यान्वित झालाय. त्याअंतर्गत 125 केव्ही क्षमतेतून 1700 युनिट्स वीज निर्मिती होते. गॅसनिर्मितीनंतर निघालेली स्लरी थेट शेतापर्यंत पोच केली जाते. कंपनीने यासाठी खास दोन टॅंकर तयार केले आहेत. शेतात टॅंकर पोचल्यानंतर नळीच्या साह्याने थेट पिकाला स्लरी सोडता येते. (व्हिडिओ पहा.)

पोल्ट्री खतामुळे होणारे प्रदुषण कमी झाले. खतातून गॅस मिळाला. गॅसमधून वीज निर्मिती झाली. यातून ब्रीडर्स फार्म युनिट्सची विजेची गरज भागली. गॅस निघून गेल्यानंतर उरलेल्या खताची गुणवत्ता वाढली. स्लरीद्वारे पिकांना थेट पोषण मिळू लागले. विशेष म्हणजे, किरण बच्छाव यांनी मका पिकास स्लरी दिली. पोल्ट्री कंपन्या खाद्य निर्मितीसाठी मका विकत घेतात. खाद्यातील काही भाग खतात रुपांतरीत होतो आणि तो पुन्हा मकासारख्या पिकास मिळतो.

आनंद अॅग्रो उद्योग समूहाचे चेअरमन उद्धव आहिरे सांगतात, की गिरणा-पुनद-मोसम खोऱ्यातील कांदा, डाळींब, मका आदी प्रमुख पिकांसाठी *पोल्ट्री उद्योग पीक पोषण पुरवणारा उद्योग* म्हणून भविष्यात पुढे येणार आहे. सर्वच पोल्ट्री कंपन्या आता पारंपरिक पद्धतीने खत विक्री न करता त्यातून गॅस, वीज, स्लरी अशी उत्पादने तयार करत आहेत. यातून रोजगारनिर्मितीही होतेय. पोल्ट्रीवर आधारित उद्योग आणि पुरक पिकांची एक चांगली इको सिस्टिम तयार होत आहे.

– दीपक चव्हाण, ता. 26 जून

Categories: Uncategorized

agriculturist

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *