Menu Home

‘पोल्ट्री’विषयी अफवांबाबत शास्त्रीय पडताळणी करावी

व्हेट्स इन पोल्ट्रीचे मीडियाला आवाहन

…कुक्कुटपालनामधून एक नवा विषाणू पसरणार असून, त्यातून पुढील महामारी पसरण्याची शक्यता असल्याची एक अफवा सदृश बातमी एका न्यूज चॅनेलने प्रसारित केली. वस्तुतः एका अमेरिकन आहारतज्ज्ञांच्या केवळ भाकितावर आधारीत ही बिनबुडाची व खोडसाळ बातमी होती. अशा प्रकारच्या शास्त्रीय गोष्टीशी संबंधित बातम्या देण्यापूर्वी त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत जाणून घेणे किंवा त्या क्षेत्रामध्ये संशोधन करणाऱ्या व्यक्तींकडून दुसरी बाजू मांडणे अत्यावश्यक असते. इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी याचे ताळतंत्र सोडून बातम्या करण्यामुळे संबंधित उद्योगाला व लहान मोठ्या पोल्ट्री उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसू शकतो.

या पुस्तकामुळे विनाकारण पसरली भिती ः
अमेरिकन आहारतज्ज्ञ डॉ. मायकेल ग्रेगर यांचे ‘हाऊ टू सर्वाइव्ह ए पॅनडेमिक’ हे नवे पुस्तक प्रकाशित झाले. त्यामध्ये जगभरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये केल्या जाणाऱ्या पोल्ट्री उद्योगामध्ये बदल करण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली. त्या सोबतच कोंबड्याशी संबंधित एखादा हानिकारक विषाणू सर्व जगभरामध्ये पसरून त्याचे कोरोनापेक्षाही अधिक तीव्र अशा महामारीमध्ये रूपांतर होईल. त्यात जगाच्या लोकसंख्येच्या अर्धी लोकसंख्या नष्ट होण्याचा पोकळ दावा करण्यात आला आहे. पोल्ट्री उद्योगामध्ये एकाच ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढवल्या जाणाऱ्या पक्ष्यांमार्फत बर्ड फ्लू सारख्या रोगांचा प्रसार होऊ शकतो. या रोगांच्या वेगवान पुनरुत्पादन व पैदाशीसाठी योग्य वातावरण पोल्ट्री उद्योगामध्ये राहू शकते, असे त्यांचे मत आहे. डॉ. मायकेल ग्रेगर हे कोणत्याही प्राणीज पदार्थांचा वापर नसलेल्या शाकाहाराचा (व्हेगान) प्रचार व प्रसार करतात.

ही मते बिनबुडाची कशी आहेत, ते आपण पाहू.

भारतात आणि महाराष्ट्रामध्ये अत्यंत शास्त्रीय पद्धतीने कुक्कुटपालन केले जाते. प्रत्येक पक्ष्याच्या योग्य वाढीसाठी आवश्यक तितक्या जागेचे नियोजन केलेले असते. पक्ष्यांच्या आरोग्यपूर्ण वाढीसाठी संतुलित आहाराचे व्यवस्थित नियोजन केले जाते. हे सर्व पक्षी त्यांच्या पूर्ण आयुष्यकाळामध्ये रोगमुक्त, ताणमुक्त राहावेत, यासाठी नियमीत लसीकरण केले जाते. दर काही टप्प्यावर पक्षी पशुवैद्यकांकडून तपासले जातात.

मानवी आरोग्यासाठी प्रथिनांचा सर्वात स्वस्त स्रोत ः
सध्या आरोग्यासाठी आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी अंडी आणि कोंबड्यांचे मांस हा अत्यंत महत्त्वाचे स्रोत असल्याचे भारत सरकार आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन, हैदराबाद यांनी अधोरेखित केले आहे. सर्वसामान्यांच्या प्रथिनांच्या पूर्ततेसाठी हा स्वस्त पर्याय ठरतो. कुक्कुटपालन उद्योगामध्ये लहान मोठ्या शेतकऱ्यांसह अनेक कंपन्याही कार्यरत आहेत. या व्यवसायावर लाखो लोकांची उपजीविका अवलंबून आहे. कोंबडी खाद्यासाठी पिकवण्यात येणाऱ्या मका आणि सोयाबीन या पिकांच्या उत्पादनामध्ये लक्षावधी शेतकरी कार्यरत आहेत. त्या सर्वाना अशा बिनबुडाच्या बातम्यांची आर्थिक झळ व फटका बसतो. दूरगामी परिणाम होतात. साधारण तीन महिन्यापूर्वी कोरोना विषयक अफवेमुळे प्रचंड नुकसान पोल्ट्री उद्योगाला सोसावे लागले. त्यातून हा व्यवसाय नुकताच कुठे सावरू लागला आहे. त्यात अशा बिनबुडाच्या वक्तव्यांचा आणि त्यावर आधारित बातम्यांमुळे लोकांमध्ये विनाकारण शंकेचे वातावरण तयार होऊ शकते.

वेट्स इन पोल्ट्री या संस्थेबाबत ः
वेट्स इन पोल्ट्री ही संस्था पोल्ट्री उद्योगाशी संबंधित खाजगी आणि सरकारी संस्थांशी जोडलेल्या पशुवैद्यकांची संघटना आहे. आमच्या संघटनेमार्फत पोल्ट्रीद्वारे पसरणाऱ्या अशा कोणत्याही विषाणूची अथवा महामारीची पृष्टी करत नाही. लोकांनी विनाकारण घाबरून जाऊ नये. उलट कोंबडी आणि अंडी हे प्रथिनांचे उच्च स्रोत आहेत. ते सध्याच्या कोरोना विरुद्धच्या लढ्यामध्ये प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. कोणतीही भिती न बाळगता त्यांचे सेवन सुरू ठेवावे, असे आवाहन डॉ. अजयकुमार देशपांडे व सहकाऱ्यांनी आपल्या वेट्स इन पोल्ट्री या संस्थेमार्फत केले आहे. (संकलन – पोल्ट्री अवेअरनेस )

Categories: Uncategorized

agriculturist

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *