Menu Home

दररोज किती अंडी खावीत..?

मानवी पोषणासंदर्भात प्रो. डॉ. अजित रानडे यांचा लेख जरूर वाचा

Photo Source – Internet

गेल्या ३५ वर्षापासून मी कुक्कुटपालन उद्योगाशी संबंधित असून, मुंबई येथील पशूवैद्यकीय महाविद्यालयामध्ये अध्यापन करतो. आज आपल्याशी मी पोषकता आणि पोषक आहाराविषयी बोलणार आहे.

अन्न, पोषण किंवा पोषणद्रव्य हे सामान्यपणे वापरले जाणारे शब्द असून, त्यांचा वापर आहाराची गुणवत्ता सांगण्यासाठी केला जातो. जे अन्न आपण खातो, ते आपल्या शरीराला आवश्यक ते पोषक घटक देतात की अन्य काही अनावश्यक, अनारोग्यकारक गोष्टी देतात, याचा विचार करणे आवश्यक आहे. त्या सोबत आपल्या शरीराची गरज आपण आपल्या आहारातून भागवतो की नाही, हेही पाहणे महत्त्वाचे आहे. या विषयाशी संबंधित माहिती देताना मी प्रामुख्याने माझ्या कुक्कुटपालन या अभ्यासाच्या विषयाच्या अनुषंगाने बोलणार आहे. या व्यवसायातून मुख्यतः अंडी आणि कोंबडीचे मांस ही दोन उत्पादने मिळतात. त्यातही आज मी प्रथम अंड्याविषयी आणि आपल्या शरीराच्या आवश्यकतेविषयी बोलणार आहे.

आपल्या शरीराच्या गरजेविषयी चर्चा करताना प्रोटिन्स किंवा प्रथिनांचा उल्लेख वारंवार केला जातो. आपले शरीर हे प्रथिनांनी बनलेले आहे, तर प्रथिने अमिनो आम्लांनी बनलेली आहेत. माणसांच्या शरीराची वाढ होत असताना त्यासाठी प्रथिनांची आवश्यकता असते. उदा. एखाद्या माणसांचे वजन हे ६० किलो आहे, तर त्याची प्रथिनांची गरज ही ६० ग्रॅम प्रति दिन इतकी असते. जर आपण आपल्या शरीराच्या गरजेइतकी प्रथिने पुरवली नाहीत, तर कुपोषणाची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे काम करण्यामध्ये आळस येणे, लवकर थकणे अशी साधारण लक्षणे दिसतात.

भारतीय आहाराचा विचार केला असता त्यामध्ये कर्बोदकांचे प्रमाण जास्त असून, प्रथिनांचे प्रमाण एकदम कमी असल्याचे लक्षात येते. त्यामुळे आपल्याला अनेक अडचणी किंवा समस्यांचा सामना करावा लागतो. आपल्या आहारात जास्त प्रमाणात असलेल्या पोळी, भाकरी, भात यामध्ये कमी प्रमाणात प्रथिने असतात. आपल्याला प्रामुख्याने भाज्या व डाळीमधून प्रथिने मिळतात. त्यांचे खरेतर आहारातील प्रमाण अत्यंत कमी असते. जे लोक दूध पितात, ते चांगले आहे. अशाच प्राणीजन्य आहारामध्ये प्रथिनांचे प्रमाण अधिक असते. तीच बाब अंड्याची. एका अंड्याचे वजन ५५ ते ६० ग्रॅम असून, त्यामध्ये १२ टक्के (म्हणजेच ६ ते ६.५ ग्रॅम) प्रथिने असतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अंड्याद्वारे उपलब्ध झालेल्या प्रथिनांपैकी सुमारे ९७ टक्के प्रथिने शरीराद्वारे वापरली जातात. अन्य पदार्थातून मिळालेल्या प्रथिनांचे प्रमाण तुलनेने कमी असते. जर एखाद्या व्यक्तीने न्याहरीमध्ये दोन किंवा तीन अंडी खाल्ली तर त्याच्या आवश्यक प्रथिनांचा २० टक्के हिस्सा पूर्ण होतो. मग उर्वरीत प्रथिने ही अन्य पदार्थातून मिळू शकतात. म्हणजेच शरीरासाठी आवश्यक प्रथिनांची पूर्तता झाल्यामुळे आरोग्य चांगले राहते. हा माझा स्वतःचा गेल्या ३० वर्षाचा अनुभव आहे. बहुतांश खेळाडूंच्या आहारामध्ये अंड्याचे प्रमाण अधिक असते. त्यातच अलिकडेच व्यावसायिक लेअर पोल्ट्रीतील अंडी ही शाकाहारी मानली गेली आहेत, कारण त्यातून पिल्ले बाहेर येत नाहीत. त्यामुळे शाकाहारी, मांसाहारी या वादात पडण्यापेक्षा आपल्या शरीराच्या पोषणाचा विचार करून अंड्याचा आहारात वापर करू या.

प्रो. डॉ. अजित रानडे, एम. व्ही. एस. सी. , पीएच. डी. अधिष्ठाता, पशूवैद्यकीय महाविद्यालय, मुंबई.

शब्दांकन – सतीश कुलकर्णी, पुणे.

( वरील लेख पोल्ट्री अवेयरनेस या वेबसाईटवर प्रसिद्ध झाला आहे.)

Categories: Uncategorized

agriculturist

2 replies

    1. धन्यवाद मेघाजी… कृपया या ब्लॉगमधील अन्य माहिती वाचा, आपल्या मित्र परिवारात शेअर करा, ही विनंती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *