Menu Home

जाणून घ्या रेशनवर चिकन-मटणाच्या प्रस्तावामागील कारणे…

भारतीयांच्या खानपानात प्रथिनांची कमतरता आहे. ती भरून निघावी यासाठी चिकन, मटणासह उच्च प्रथिनयुक्त आहार पुरवण्यासाठी अनुदान दिले जावे. अशा आहाराच्या पुरवठ्यासाठी रेशन यंत्रणेची मदत घ्यावी, अशा प्रकारच्या प्रस्तावावर नीती आयोग काम करत असल्याचे वृत्त इकॉनॉमिक्स टाईम्सने दिले आहे.


जागतिक भूक निर्देशांकात भारताचे स्थान 117 देशांत 102 व्या क्रमांकापर्यंत घसरल्याची बातमी अलिकडेच सर्वत्र चर्चेत होती. सरकारी पातळीवर या मागील कारणे शोधली जात आहेत. यात भारतीयांच्या आहारात खासकरून प्रथिनांची कमतरता असल्याची निरीक्षणे आहेत. यासंदर्भातील निवडक नोंदी पुढीलप्रमाणे आहेत –

  1. भारत अन्नधान्यांबाबत स्वयंपूर्ण आहे. मात्र, पोषणसुरक्षेच्या बाबतीत भारत किती मागे आहे, हे आजवर विविध संस्थांनी केलेल्या पाहणीतून समोर आले आहे. अलिकडेच, भारतात 38 टक्के मुले कुपोषित तर 50 टक्के महिला अनॅमिक ( रक्तक्षयी) असल्याचे नीती आयोगाने म्हटले आहे. भारतीय लोकांना दररोजच्या अन्नातून सरासरी ३७ ग्रॅम प्रथिनं मिळतात, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या पाहणीत म्हटले आहे. सरासरी शिफारशीच्या तुलनेत हे प्रमाण जवळपास निम्याने कमी आहे. प्रत्येक व्यक्तिनं वजनानुसार ०.८ ते १ ग्रॅम प्रथिने घ्यायला हवीत, अशी शिफारस ही संघटना करते. म्हणजे ७० किलो वजनाच्या माणसाने ५६ ते ७० ग्रॅम प्रथिने घ्यायला हवीत. प्रत्यक्षात तेव्हढी घेतली जात नाहीत. विकसित देशांच्या तुलनेत हे प्रमाण निम्याहून कमी आहे.
  2. अलिकडेच भारतीयांच्या आहारशैलीबाबत झालेल्या एका पाहणीत ९१ टक्के शाकाहारी आणि ८५ टक्के मांसाहारी वयस्कांमध्ये प्रथिनांची कमतरता आढळली. जवळपास ८८ टक्के वयस्क भारतीय प्रथिनांच्या बाबतीत कुपोषित असल्याचं समोर आलं. अशक्तपणा आणि थकवा ही सर्वांत मोठी लक्षण पुढे आली तर स्थूलता, उच्च रक्तदाब व मधूमेह आदी विकारांमागेही आहारातील असंतूलन निमित्त ठरल्याचे दिसले.
  3. संयुक्त राष्ट्र संघटनेकडील अहवालानुसार – 19.5 कोटी भारतीय हे अल्पपोषित आहेत. जागतिक भूक परिमाणात वरील आकडे 25 टक्के जागा व्यापतात. एकूण 4.7 कोटी म्हणजेच सुमारे 10 पैकी 4 भारतीय मुलांची सक्षम वाढ कुपोषणामुळे होत नाही.
  4. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्युट्रिशनच्या शिफारशीनुसार वर्षाकाठी दरडोई 180 अंडी तर 11 किलो चिकनचा खप व्हायला हवा, प्रत्यक्षात भारतात वरील शिफारशीच्या तुलनेत 68 अंडी आणि 3.5 किलो चिकन इतकाच दरडोई खप आहे.

सारांश, भारतीयांमध्ये प्रथिनांची कमतरता हा पोषण तज्ज्ञांच्या दृष्टिने चिंतेचा विषय आहे. बदलते जीवनमान, ताणतणाव आणि विसंगत आहारशैलीमुळे आरोग्यविषयक समस्या निर्माण होत आहेत. देशात अगदी सधन कुटुंबातही कुपोषणाची समस्या असल्याची निरीक्षणे आहेत. समाजातील सर्वच स्तरात कुपोषण दिसतंय. आहारविषयक जागृतीवरही सरकारला भर द्यावा लागणार आहे. दररोज किती उष्मांक, प्रथिनं घ्यायला हवीत, याबाबत शालेय पातळीवर प्रचार – प्रसार करावा लागणार आहे.

  • दीपक चव्हाण, पुणे. ता. 18 डिसेंबर 2019

Photo Source – Internet

Categories: Uncategorized

agriculturist

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *