Menu Home

कडकनाथ पक्षी : वस्तूस्थिती आणि विपर्यास

Image result for kadaknath

देशी पक्ष्यांचे बिझनेस मॉडेल : शास्त्रीय मिमांसा आणि जनजागृती गरज

लेअर (अंडी) पोल्ट्रीमध्ये सध्याच्या बोलीभाषेत कमर्शियल (इंग्लिश) आणि देशी (गावठी) असे दोन प्रकार होत. राज्यात इंग्लिश अंड्यांची मार्केटिंग व्यवस्था प्रस्थापित, विकसित आहे. त्यात लिक्विडीटी आहे, म्हणजे दोन-अडीच कोटीं अंड्यांची रोज विक्री होते. तसे गावठीचे नाही. आठवडे बाजार, लोकल ट्रेडर हे गावठीचे प्रमुख खरेदीदार. पुण्या-मुंबईसारख्या मेट्रोसिटीतही देशी अंड्यांचे संघटित (organized) नेटवर्क अस्तित्वात नाही.

देशी अंडी विकायची कुठे असा पेच आहे. पुणे व परिसरात भाजी मार्केटच्या आसपास थेट हातविक्री करणारे तुरळक उत्पादक वा विक्रेते दिसतात. पुण्यातील इंग्लिश अंडी उत्पादक आणि मोठे ट्रेडर सांगतात, की आमच्यादृष्टिने ‘कडकनाथ’मध्ये वेगळे काही नाही. आम्ही याला गावठीच मानतो. आम्ही कधीही कडकनाथ वा गावठी अंड्यांचा व्यापार – व्यवहार केला नाही. ही अंडी फर्टाईल असतात. लवकर खराब होतात. एक मोठे ट्रेडर म्हणाले, की मी रोज सव्वा लाख अंडी विकतो, पण ठरवूनही पाचशे सुद्धा कडकनाथ वा गावठी अंडी विकू शकत नाही.

एका शेतकऱ्याने सांगितले, की आजघडीला गावठी अंड्यांच्या भावात कडकनाथची अंडी विकायची तयारी आहे. पण खरेदीदार नाहीत. गावाकडे श्रावणात मागणी नव्हती. आता गणपती, पुढे नवरात्रामुळे उठाव नसणार. उशिराचा पाऊस, दुष्काळामुळे गावाकडेही खप घटला आहे. कोल्डरूममध्ये अंडी ठेवलीत. करमाळ्यातील एका कडकनाथ उत्पादक गटाने फोन केला आणि म्हणाले, की 27 रुपये प्रतिकिलोचे रेडी फीड घेतोय. सहा हजार पक्षी लेईंगला आहेत. दररोज तीन हजार अंडी निघताहेत. विकायची कुठे? शिक्षित असूनही आम्ही फसलो, ट्रॅप झालो हे त्याना मान्य आहे. आधी मार्केट लिंकेजचा अभ्यास करायला हवा होता, हे ही ते कबूल करतात…

‘कडकनाथ’ची केस अगदी क्लासिकल आहे. उदा. इमू, ससे, चेन मार्केटिंग, चेन ब्रीडींग. ज्यांनी हेतूत: फसवले त्यांच्यावर कारवाई व्हायलाच हवी. पण, संबंधित वस्तूचे मार्केट किती, मागणी किती, विशिष्ट उंच भावाला खरोखरच किती ग्राहक आहेत, याचा काहीएक अभ्यास न करता शिक्षित मंडळी कसा काय व्यवसाय सुरू करतात, हे कोडेच आहे.

आज आपण ज्या व्हॉल्यूमने माल पिकवतोय, तेवढा ग्राहकच अस्तित्वात नाही, तर त्याचे जे व्हायचे ते कडकनाथच्या अंडी, मांसाबाबत होत आहे. जिथे इंग्लिश अंड्याच्या खपवाढीला मर्यादा आहेत, तिथे गावठीचा निभाव कसा लागणार. (मागील सहा महिन्यांपासून चार रूपये खर्चाचे इंग्लिश अंडे तीन रुपयाला विकले जातेय.) थेट विक्री क्षेत्रातले एक अनुभवी व्यक्ती म्हणाले, की कडकनाथ वा गावठीची अंडी आम्ही जरूर विकू, त्याची बॅकवर्ड – फॉरवर्ड लिंकही तयार करू, पण विकायची कुठे, ग्राहक कुठे आहेत, खप कुठे होतो हे सांगा म्हणजे आम्ही मदत करू…

आता जे घडले त्यावर अधिक चर्चा नको. यातून मार्ग कसा काढायचा, हा कळीचा मुद्दा आहे…यासाठी मुद्दे मांडतोय, तुम्ही त्यात भर घालू शकता…

  1. कंट्री बर्डसाठी ( देशी) स्वंतत्र विक्री व्यवस्था कशी उभी राहील? स्थिर व सातत्यपूर्ण पुरवठा मिळू शकतो का?
  2. महाराष्ट्रातील सर्व देशी अंडी, चिकन एकाच ब्रॅंडने विकण्यासाठी बॅकवर्ड लिकेंज उभ्या करता येतील का?
  3. कमर्शिअल पोल्ट्रीच्या धर्ती बॅकवर्ड इंटिग्रेशन कसे करता येईल. ज्यात, खाद्यनिर्मिती, ब्रीडींग, हॅचिंग, ग्रोईंग आदींचे नियोजन एकाच प्लॅटफॉर्मवरून करता येईल का? Madhya Pradesh Women Poultry Producers Company च्या धर्तीवर असे काम सामूहिकपणे उभे करता येईल का?
  4. सूपर मार्केट्समध्ये महाराष्ट्रातील देशी अंडी, चिकनचा ब्रॅंड दिसत नाही. ही संधी कशी साधता येईल?
  5. एकूण फॉरवर्ड व बॅकवर्ड लिंकेज जर एखाद्या एंटरप्रेन्यूअरला बळकट करायच्या असतील, तर फंडींग कसे उभे करावे?

शास्त्रीय मिमांसा, जनजागृती गरज :
“कडकनाथ”च्या पेचप्रसंगावर प्रा. डॉ. माणिक धुमाळ यांचे मत
देशी ब्रीडच्या पक्ष्याला कमर्शियल पक्ष्यांचे खाद्य दिले म्हणून कमर्शिअल पक्ष्याप्रमाणे वजन वा अंडी मिळणार नाहीत. देशी पक्षी त्याच्या आनुवंशिक गुणधर्मानुसारच वाढतो. चांगले खाद्य खाऊन फार तर 17 आठवड्याच्याऐवजी 15 आठवड्यात सव्वा किलो वजन मिळेल. पण या प्रक्रियेत जिथे 100-150 रुपये खर्च होतो, तिथे 500 रु. खर्च झाला आणि इथेच चुकले.
कडकनाथचे वैशिष्टे आहे, त्याच रंग आणि अॅंटिऑक्सिडेंट गुणधर्म. देशी ब्रीडप्रमाणेच त्याला मोकळे सोडा. ब्रॉयलरप्रमाणे त्याचे व्यावसायिकरण चुकीचे आहे. ब्रॉयलर्सचे गुणधर्म वेगळे, ते देशी पक्ष्यांना लागू पडणार नाही. ब्रॉयलर्ससारखे खाद्य खावून वजनात रुपांतर होण्याचे गुणोत्तर (एफसीआर) देशी पक्ष्यांना लागू पडणार नाही.
काहींनी कडकनाथमध्ये ‘क्रॉस’ करून वजने वाढवण्याचा प्रयत्न केला, पण यात 40, 50 टक्के रंग नाहीसा झाला…हे सर्व चुकीच्या दिशेने गेले. काही तरी पळवाटा शोधून व्यावसायिकरण झाले आणि तिथेच सारे चुकले. वजनवाढीत 80 टक्के वाटा आनुवांशिक तर 20 टक्के वाटा खाद्याचा असतो. हे विसरू नये.
कडकनाथ पक्ष्यामध्ये चांगले गुणधर्म आहेत. त्याचा रंग, अॅंटिऑक्सिडेंट घटक या जमेच्या बाजू. मात्र, त्यासाठी काहीही कारण नसताना उत्पादन खर्च वाढवून, ग्राहकांच्या माथी 50 रु. अंडी आणि 500 रु. किलोने पक्षी मारून यश मिळणे अशक्य आहे, असे डॉ. धुमाळ सांगतात.

लेखक – दीपक चव्हाण, पुणे. chavan.deepak@gmail.com ( कृषी अभ्यासक, पत्रकार)

Categories: Uncategorized

agriculturist

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *