Menu Home

संयमित अंडी सेवनातून मिळतात ‘गुड कोलेस्टेरॉल’!

मानवी पोषणात अंड्यांच्या उपयुक्ततेबाबत डॉ. अजित रानडे यांचा लेख :

अंडी खाणे कसे आवश्यक आहे, याविषयी आपण मागील भागामध्ये पाहिले. मात्र, अनेकांच्या मनामध्ये अंडी खाण्याविषयी काही प्रश्न, शंका आहेत. त्यातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे, अंड्यातील कोलेस्टेरॉल आपल्या शरीरासाठी चांगले नाही. एका अंड्यामध्ये १८० ते २०० मिलीग्रॅमपर्यंत कोलेस्टेरॉल असते.
खरेतर कोलेस्टेरॉल हे मानवी शरीरासाठी आवश्यक अन्नघटकांपैकी एक असून, शरीरामध्ये अनेक कार्ये करते. त्यापैकी सर्वात महत्त्वाचे कार्य हे संप्रेरकांची निर्मिती हे आहे. ही संप्रेरके वाढीच्या काळामध्ये वाढीमध्ये संतुलनाचे कार्य, तर प्रौढपणी लैंगिकतेविषयक कार्य करतात. या संप्रेरकांमधील संतुलन, निर्मितीचे महत्त्वाचे कार्य कोलेस्टेरॉलतर्फे केले जाते. तसेच कोलेस्टेरॉल न्युरोमस्कुलर कोऑर्डिनेशन म्हणजे मेंदूपासून वेगवेगळ्या स्नायूंपर्यंत संदेश पोचवण्यासाठीही महत्त्वाचे आहे. आपण तीन किंवा चार अंडी खाल्ली तर आपल्या शरीरामध्ये ५४०-७२० मिलीग्रॅम कोलेस्टेरॉल जाते. जे आवश्यक आहे. जर आपण ते खाल्ले नाही, तर आपल्या शरीरातील यकृत कोलेस्टेरॉलची निर्मिती करते. आपल्या शरीरामध्ये आलेल्या कोलेस्टेरॉलच्या प्रमाणानुसार यकृताला आवश्यक तितक्या कोलेस्टेरॉलच्या निर्मितीचा संदेश मिळतो. तशी रचना आपल्या शरीरामध्ये असते. जर आपल्या शरीराला ८०० मिलीग्रॅमची गरज असेल, आणि आपण ४०० मिलीग्रॅम कोलेस्टेरॉल खाल्ले, तर उर्वरीत ४०० ग्रॅम कोलेस्टेरॉल यकृतामार्फत तयार केले जाईल. शरीरातील यकृताशी असलेले संदेशप्रणाली कार्यरत असेल, तर कोलेस्टेरॉलमुळे काही त्रास होणार नाही. मात्र, त्यामध्ये काही अडचण असल्यास कोलेस्टेरॉल खाण्यावर नियंत्रण ठेवले पाहिजे. पण सामान्य आरोग्यपूर्ण व्यक्तीद्वारे खाल्ल्या जाणाऱ्या कोलेस्टेरॉलप्रमाणे (अंडी किंवा कोणत्याही आहारातून) यकृताचे कार्य सुरू असते.
महत्त्वाची गोष्ट अशी आहे की अंड्यांमध्ये कोलेस्टेरॉल प्रमाणे मोठ्या प्रमाणात फॉस्फोलिपिड्स आहेत. ती कोलेस्टेरॉल रक्तामध्ये फिरते ठेवतात, रक्तवाहिन्यामध्ये चिकटू किंवा साठू देत नाहीत. अंडी खाल्यामुळे ह्रदयाशी संबंधित आजार होईलच, ही बाब खरी नाही. यकृताचे कामकाज योग्य राहिले पाहिजे , यासाठी आपली जीवनशैली व्यवस्थित ठेवली पाहिजे. त्यासाठी दैनंदिन व्यायाम करणे, धुम्रपान व अन्य व्यसने टाळणे आवश्यक आहे.
अंड्यामध्ये संप्रेरके, वाढ संजीवके किंवा प्रतिजैविके असल्याचा अपप्रचार केला जातो. मात्र, भारतामध्ये योग्य व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करत असल्यामुळेच पोल्ट्री उद्योग ८ ते १० टक्के वेगाने वाढत आहे. पक्ष्यांच्या रोग व्यवस्थापनासाठी अत्यावश्यक स्थितीमध्ये प्रतिजैविकांचा वापर केला जात असला तरी ती निचरा होण्याचा कालावधीही गृहित धरला जातो. भारतीय पोल्ट्री उद्योगामध्ये कोणत्याही वाढ संप्रेरकांचा वापर केला जात नाही. त्यामुळे चिंता करण्याचे कारण नाही, हे विश्वासाने सांगत आहे. तेव्हा आपल्या शरीराच्या आरोग्यासाठी, चयापचयासाठी आपल्याला अंडी खाणे जरुरी आहे, हे पुनश्च सांगून थांबतो.

प्रो. डॉ. अजित रानडे,
(एम. व्ही. एस. सी. , पीएच. डी)
अधिष्ठाता, पशूवैद्यकीय महाविद्यालय, मुंबई.

Categories: Uncategorized

agriculturist

1 reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *