Menu Home

अंडी सेवनाबाबत ‘एफएसएसआय’चे मार्गदर्शन: लेखांक – 5

खोटे अंडे किंवा प्लॅस्टिकच्या अंड्याविषयी भाष्य करण्यापूर्वी आपण अंडी उत्पादन आणि विक्रीचे अर्थशास्त्र जाणून घेणे आवश्यक आहे. आपल्या देशातील २०१६-१७ मधील एकूण अंडी उत्पादन हे ८८.१ अब्ज इतके असून, गतवर्षीच्या तुलनेमध्ये त्यात १२ टक्क्यापेक्षा अधिक वाढ झाली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात उत्पादीत होणाऱ्या अंड्याच्या विक्रीतील नफ्याचे प्रमाण अत्यंत कमी असते.
त्याच प्रमाणे नैसर्गिक अंड्याप्रमाणे तंतोतंत दिसणारे अंड्याच्या निर्मितीचे कोणतेही तंत्रज्ञान अद्यापपावेतो ज्ञात नाही. अर्थात, काही रासायनिक घटकांचा उदा. कॅल्शिअम क्लोराईड, अल्गीनेट आणि किंवा विविध डाय, रंगामध्ये वापरले जाणारे जिलेटिन यासारख्या घटकांपासून कृत्रिम अंडे बनवता येते. मात्र, या तंत्रज्ञानाचा वापर केवळ अन्य मुलद्रव्ये किंवा पोषक घटकांच्या आवरणासाठी (कॅप्सूलिंग) केला जातो. उदा, फिश ऑईलच्या आवरणासाठी वापरले जाणारे मऊ कॅप्सुल्स. हे तंत्रज्ञान प्रामुख्याने माशांच्या अंड्याप्रमाणे दिसणाऱ्या खोट्या अंड्याच्या निर्मितीसाठी वापरले जाते. त्याचा वापरही मुलतः अंडी खाणाऱ्या माशांना आकर्षित करण्यासाठी केला जातो. त्याच प्रमाणे शाकाहारी सुशी (माशांच्या अंड्याचा प्रकार) तयार करण्यासाठी हे तंत्र वापरले जाते. अर्थात, अशा प्रकारची अंडी बनवण्यासाठी अधिक मजूरांची आवश्यकता भासत असल्याने ते अधिक खर्चिकही होते. यातील लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे कोंबडीच्या अंड्याच्या तुलनेमध्ये माशांची अंडी ही ५० ते १०० पटीने लहान असतात.
मात्र, कोणत्याही स्थितीमध्ये अंड्याप्रमाणे दिसणारे, वास येणारे आणि चव लागणारे माशाचे किंवा कोंबडीचे अंडे तयार करणे हे अत्यंत अवघड आणि जवळजवळ अशक्य आहे. आता आपण अंड्याच्या निर्मिती खर्चाचा विचार करू, ती साधारणपणे ५ रुपयांच्या आसपास आहे. जरी एखाद्या घावूक विक्रेत्याने अंडे चार रुपयाला खरेदी केले, तर त्याचा फायदा केवळ एक रुपया प्रति अंडे इतकाच आहे. म्हणजेच कृत्रिम किंवा खोटे अंडे विकत घ्यायचे असेल, तर तो चार रुपयांपेक्षाही कमी किंमतीलाच घेईल. इतक्या कमी किंमतीला खोटे अंडे तयार होणे अशक्य वाटते.
एका अहवालानुसार अंड्यावर त्रिमितीय प्रिटिंग करण्याचा खर्च ५००० रुपये इतका आहे, तोही १०० पेक्षा अंड्यावर प्रिंटिंग केले तर. आता पाच रुपयांच्या अंड्याची विक्री कोण ५००० रुपयांपेक्षा अधिक किंमतीला करू शकेल? या सर्व बाबींचा म्हणजेच त्यातील घटक पदार्थांची किंमत, मजूरी यांचा विचार केला असता खोट्या अंड्याच्या निर्मितीसाठी नैसर्गिक अंड्याच्या किमान ४ ते ५ पट अधिक खर्च येणार आहे. म्हणजेच खोटे अंडे बनवणे ही सहज जाता जाता करण्यासारखी गोष्ट नाही. त्यासाठी अत्यंत व्यावसायिक कौशल्य लागणार आहे. बरे इतके व्यावसायिक कौशल्य वापरून त्यातून मिळणाऱ्या नफ्याचे प्रमाणही तुलनेने अत्यंत कमी राहण्याचीच अधिक शक्यता आहे. त्यामुळे कोणीही याच्या फंदात पडण्याची शक्यताही नाही.

त्यातही अंडे हे त्वरीत खराब होणाऱ्या धोकादायक पदार्थांमध्ये येत असल्याने अंड्याची निर्यात आणि आयातीचा विषय येताच अधिकृत प्रयोगशाळांमध्ये तपासण्या करणे बंधनकारक असते. त्यामुळे कृत्रिम अंडी निर्माण करणे महाग असूनही त्यांची अन्य देशांमध्ये निर्यात करणे अशक्य ठरते. म्हणजेच तयार केलेले महाग असे कृत्रिम अंडे भारतातील अन्य नैसर्गिक अंड्याच्या स्पर्धेमध्ये स्वस्तात विकावे लागेल. (ते अर्थात कोणालाही परवडणारे नसेल.)

५) अंड्याच्या दर्जाविषयी अन्य दंतकथा –

 • प्लॅस्टिक किंवा कृत्रिम अंडी खरी आहेत.
  नाही. प्लॅस्टिक किंवा कृत्रिम अंडी ही मुख्यतः दंतकथा असण्याची दोन कारणे – अ) निर्मितीचे अर्थशास्त्र ब) नैसर्गिक अंड्याशी सर्वथा साम्य असणारी अंडी बनवण्यातील अशक्यता.
 • खराब किंवा कुजलेल्या अंड्यांना नेहमी खराब वास येतो.
  अंड्यामध्ये सॅलमोनेल्ला असला तरी त्याची चव, वास हा चांगला असू शकतो. कवचाला तडे गेले असल्यास त्यावरील जिवाणू आत जाऊ शकतो. तो पुढे त्याच्या संपर्कातील अन्य पदार्थांमध्ये शिरकाव करू शकतो. अर्थात, अंड्याला किचिंतही खराब वास असल्यास त्याचा वापर करू नये.
 • अंड्यावरील धूळ किंवा कोंबड्यांची विष्ठा असणे म्हणजे ती सेंद्रिय व नैसर्गिक असल्याचे लक्षण आहे.
  अर्थात, धूळ हा जरी नैसर्गिक घटक असला तरी तो आरोग्यासाठी चांगला नाही. कोंबडीच्या विष्ठेमध्ये तर असंख्य हानीकारक जिवाणू मुख्यत सॅलमोनेल्ला सारखे असू शकतात. त्यामुळे अशी धुळीने भरलेली अंडी न वापरता त्वरीत नष्ट केली पाहिजेत.
 • जर अंडी धुळीने खराब झाली असतील, तर ती धुवून आपण साफ करू शकतो.
  नाही, अंडी धुतल्यानंतर अधिक सच्छिंद्र होतात, त्यामुळे अंडी कधीही धुवू नयेत. सामान्य किंवा धुळीने माखलेले अंडे धुतल्यास त्यामध्ये हानीकारक जिवाणू (धुळीतील किंवा पाण्यातील) अंड्यामध्ये शिरण्याचा धोका वाढू शकतो.
 • अंडी खोलीच्या सामान्य तापमानामध्ये ठेवल्यास ताजी राहतात, त्यांना रेफ्रिजरेटरमध्ये ठेवण्याची आवश्यकता नाही.
  रेफ्रिजरेटरमध्ये अंडी ठेवल्यास ती सामान्य तापमानातील अंड्यापेक्षा अधिक काळ काळ ताजी राहतात. आणि त्याच प्रमाणे कोणत्याही जिवाणूंची वाढ होण्याचा धोका कमी होतो.
 • अंडी हा प्रथिने, खनिजे आणि जीवनसत्त्वाचा दूधापेक्षा उत्तम स्रोत आहे. आणि कच्चे अंडे कोणत्याही आजारी माणसाला दिल्यास प्रथिने आणि खनिजांची उपलब्धी होऊ शकेल.
  नाही. गर्भवती महिला, नवजात मुले किंवा वयस्क माणसे यांना कधीही कच्ची अंडी देऊ नयेत. अशा माणसांनी कच्ची अंडी खाल्ल्यास सॅलमोनेल्ला प्रादुर्भावाचा धोका वाढू शकतो. त्याच प्रमाणे जे तीव्र आजारी आहेत, अशा लोकांना आजारी असण्याच्या काळामध्ये कच्च्या स्वरुपामध्ये अंडी देण्याचे टाळावे. प्राधान्याने चांगली शिजवलेली अंडी विशेषतः ज्यातील पांढरा भाग आणि पिवळा बलक हा पूर्णपणे घट्ट आहे, अशी अंडी वापरणे अधिक श्रेयस्कर ठरते.
 • न शिजवलेली (कच्ची) अंडी हा प्रथिने आणि पोषक घटकांचा चांगला स्रोत आहे.
  नाही, कच्च्या स्वरुपामध्ये अंड्यातील घटकांचा वापर उदा. अंड्यातील पांढऱ्या भागापासून बनवलेले मिल्कशेक पिणे हे धोकादायक ठरू शकते. अंडे शिजवल्यामुळे त्याकील प्रथिनांचे किंवा पोषक घटकांचे प्रमाण कमी होत नाही किंवा ते अनुपलब्धही होत नाहीत.
 • अंड्याची तरंगण्याची चाचणीमुळे चांगले आणि खराब अंड्यातील फरक स्पष्टपणे दिसून येतो.
  तरंगण्याच्या चाचणीमुळे ताजी आणि जुनी अंडी यातील फरक स्पष्टपणे कळत असला तरी सॅलमोनेल्ला प्रादुर्भावासारखी स्थिती समजून येईलच असे नाही. त्यामुळे अंड्याच्या चांगलेपणाची ही एकमेव चाचणी असू शकत नाही.

व्यापारी आणि विक्रेत्यांसाठी –

 • अंडी नेहमी विश्वासार्ह स्रोतांकडूनच घ्यावीत.
 • व्यापारी आणि विक्रेत्यांनी अंड्याचा दर्जा कमी होणे टाळण्यासाठी खालील मार्गदर्शक तत्त्वाचा वापर करावा.
 • अंडी साठवणीमध्ये योग्य मर्यातेपर्यंत थंड वातावरण ( प्राधान्याने रेफ्रिजरेटरचा वापर करावा.) असणे गरजेचे आहे.
 • तीव्र वास असलेल्या अन्न किंवा अन्नपदार्थांच्या जवळ अंड्याची साठवण करू नये.
 • अंड्याची साठवण किंवा प्रदर्शनीय ठिकाण हे सूर्यप्रकाशापासून दूर असावे.
 • साठवणीतील अंड्याची विक्री पहिल्यांदा आलेली प्रथम ( फर्स्ट इन फर्स्ट आऊट) या प्रमाणे करावी. म्हणजेच जुना साठा विक्रीच्या काऊंटरवर प्रथम ठेवावा. तो संपल्यानंतर पुढील ताजा साठा बाहेर काढावा. शक्यतो सर्व अंडी ताज्या स्वरुपामध्ये विकली जावीत.
 • उष्ण वाहनांमध्ये किंवा उष्ण तापमानामध्ये अंड्याची वाहतूक टाळावी.
 • ग्राहकांनाही अंडी थंड तापमानामध्ये किंवा रेफ्रिजरेटरमध्ये साठवण्याचा सल्ला द्यावा.
 • तडे गेलेले किंवा धुळीने खराब झालेले अंडे त्वरीत नष्ट करावे.
 • खराब किंवा धुळीने माखलेली अंडी ग्राहकांना कधीही विकू नयेत.

नियामक कर्मचारी आणि प्रयोगशाळांसाठी –

 • नमुन्याची स्थिती – विश्लेषणासाठी अंड्याचे नमुने घेतल्यानंतर त्यांची वाहतूक प्रकर्षाने थंड तापमानामध्ये करावी. ते उष्ण तापमानामध्ये राहणार नाहीत, याची काळजी घ्यावी. अंड्याची वाहतूक ही विशिष्ठ अशा कार्टन किंवा केसमध्ये करण्याचा सल्ला देण्यात येत आहे.
 • चाळणी करणे आणि निश्चिती करणे – संशयित कृत्रिम किंवा खोट्या अंड्याचे नमुने हे त्यातील खऱ्या प्रथिनांकरिता ब्युरेट्स/लॉवरीज यांच्या प्रमाणे किंवा क्जेलडाहल पद्धतीने चाळणी लावली पाहिजे. नैसर्गिक कोंबडीचे अंड्यामध्ये (संपूर्ण अंडे) प्रथिनांचे प्रमाण ११.५ ते १२.५ टक्के, लिपीड घटकांचे प्रमाणे ११.५ ते १२ टक्के आणि कर्बोदकांचे प्रमाण नगण्य (०.५ टक्क्यापेक्षाही कमी, तेही असले तर) असते. जरी अंडी ही त्यातील अमिनो आम्लांच्या विशिष्ठ संयोगासाठी ओळखली जातात. (दुधानंतर) अशा अमिनो आम्लांच्या संयोगानुसार सामान्य अंडे आणि संभाव्य खोटे किंवा कृत्रिम अंडे वेगळे करणे शक्य असते. (समाप्त.)

Categories: Uncategorized

agriculturist

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *